संस्था परिचय
अहमदनगर जिल्हा वाचनालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुने सार्वजनिक वाचनालय आहे. इंग्रज अधिकारी कॅ. पी. टी. फ्रेंच यांनी १८३८ साली या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. सुरुवातीला जनरल नेटिव्ह लायब्ररी या नावाने स्थानिक लोकांच्या सहभागाने व स्थानिक लोकांसाठी सुरु करण्यात आलेल्या या वाचनालयाचे सिटी लायब्ररी असे नामकरण झाले या नंतर काळांतराने अहमदनगर जिल्हा वाचनालय असे संबोधण्यात येवू लागले. या वाचनालयाच्या जडण घडणीत अनेक मान्यवरांनी मोलाचे योगदान दिले आहे. यात तात्या चिंचोरकर, डॉ. रानडे, ना. धो. नानल, डॉ. अविनाश गुणे, श्री. दादा उर्फ दत्तोपंत डावरे. यांचा उल्लेख आवर्जुन करणे क्रमप्राप्त आहे.
ऐतिहासिक वारसा असलेल्या या वाचनालयास वेळोवेळी अनेक मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत व वाचनालयाच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले आहे. आज अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, प्रमुख सहकार्यवाह श्री. विक्रम राठोड, उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, उपाध्यक्ष श्री. अजित रेखी तर खजिनदार श्री. तन्वीर खान सहकार्यवाह श्री.राजा ठाकूर हे पदाधिकारी व सदस्य मंडळ वाचनालयाच्या कार्याची धुरा प्रभावीपणे पेलत आहेत.
अहमदनगर जिल्हा वाचनालय
अहमदनगर जिल्हा वाचनालयात बालविभाग, मुक्तद्वार विभाग, महिला विभाग, पुस्तक विभाग, नियतकालिक विभाग, संदर्भ विभाग असे विविध विभाग आहेत. मुक्तद्वार विभागात रोज १८ वर्तमानपत्रे नियमित येतात. ८०० ते ९०० वाचक रोज याचा लाभ विनामुल्य घेत असतात. वाचनालयाच्या विविध विभागात मिळून २६०० सभासद आहेत. रोज १२०० / १४०० सभासद नियमित लाभ घेतात. वाचनालयात एकूण १० कर्मचारी असून ग्रंथपाल म्हणून श्री. अमोल इथापे हे काम पाहतात.
अहमदनगर जिल्हा वाचनालय फक्त ग्रंथ संग्रह करणे व वाचन चळवळ वृद्धी हेच कार्य करीत नसून सामाजिक व सांस्कृतिक कार्यही जोमाने करीत आहे. यासाठी वाचनालयातर्फे विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात शालेय विदयार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वकृत्वस्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्यवाचन, नाट्यवाचन, अभंग गायन स्पर्धा, स्फूर्तीगीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात दरवर्षी १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वाचनालयाचे वतीने निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले जाते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळतो. तसेच २६ जानेवारी भारतीय गणराज्य दिनाच्या पूर्व संध्येला शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्फूर्तीगीत स्पर्धेचे आयोजन केले जाते. मे महिन्याच्या सुट्टीत संस्कारक्षम मुलामुलींसाठी त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी १०/१२ दिवसांचे संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन वाचनालयाच्या वतीने दरवर्षी नियमित केले जाते. ग्रंथ संग्रह करणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून आजपर्यंत हिंदी, इंग्रजी मराठी या भाषेतील एक लाखाच्यावर ग्रंथ वाचनालयात असून कथा, कादंबरी, चरित्र, प्रवास वर्णन, कविता संग्रह. ललितवाड्मय, भौतिकशास्त्र, खागोलशास्त्र, व्यायाम, रुचकर खाद्यपदार्थ, माहिती व तंत्रज्ञान तसेच बाल-साहित्य अशा विविध विषयांवरील शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत.
वाचनालयात हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेतील विविध मासिके, साप्ताहिके, पाक्षिके, वार्षिके नियमित येत आहेत. ऐन दिवाळीमध्ये ५०० दिवाळी अंकाची मेजवानी वाचकांना उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येकाला त्यांचा ग्रंथ मिळावा. सर्वांची वाचनाची भूक भागवता यावी या हेतूने जिल्हा वाचनालयाने अंधासाठी ब्रेल लिपीतील पुस्तके विनामुल्य उपलब्ध करून दिली आहेत. शहरातील श्रोते व वाचकांसाठी मेजवानी ठरलेली वसंत व्याख्यान मला दरवर्षी मे मध्ये घेतली जाते ५/६ दिवस चालणाऱ्या या व्याख्यान मालेत विविध विषयावरील मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातात यास खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो.
अशा या विविध उपक्रमांची व कार्याची पावती म्हणूनच २००३ साली वाचनालयास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथालय शहरी विभाग ‘अ’ वर्ग जिल्हा वाचनालय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे. रु. ५० हजार रोख व प्रमाणपत्र असे याचे स्वरूप आहे. तसेच २००४ साली उत्कृष्ट ग्रंथालय सेवक म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. संजय लिहिणे यांना मा. मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. रु. २५०००/- सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे यांचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र शासनाचे वतीने शतकोत्तर ग्रंथालयांना प्रोत्साहन म्हणून दिलेले रु. ५,००,०००/- अनुदान वाचनालयाला मिळाले असून त्यातून वाचनालयाच्या नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. या अनुदानातून वाचनालयाच्या कामकाजात आधुनिकता आली आहे.
सावेडी वाचनालय
सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस माणसापासून दुरावत असतांना परस्परातील आपलेपण संपत असतांना पुस्तके हीच प्रत्येकाचे खरे मित्र आहेत. ज्ञानदान, मनोरंजन या उद्देशाने वाचन चळवळ सध्याच्या जगात वृद्धिंगत व्हावी हाच आमचा उद्देश आहे. नगर पालिकेची महानगरपालिका झाली. या विस्तारलेल्या शहरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तके पोह्चावीत म्हणून व अनेक नागरिकांची मागणी असल्यामुळे सावेडी सारख्या उपनगरात देखील वाचनालय आपली वाचन सेवा वाचक वर्गास देत आहे. सावेडी वाचनालयात मराठी, इंग्रजी, हिदी भाषेतील भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील वैशिष्ट्य म्हणजे दिवाळी अंक अनेक विषयांवरील दिवाळी अंक या सावेडी वाचनालयात वाचकांसाठी अल्प शुल्कात उपलब्ध आहेत. सकाळ-संध्याकाळ कार्यरत असलेल्या या वाचनालयात ६५० मेंबर वाचक सभासद लाभ घेत आहे. प्रोफेसर कॉलनी चौकात स्थित असलेल्या या सावेडी वाचनालयात अबालवृद्धांसाठी भरपूर वाचन साहित्य उपलब्ध आहे.
अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक म्हणाले :- वाचनालय सारख्या सेवाभावी संस्थेत काम करतांना मनाला एक प्रकारे आनंद मिळतो. वाचकांनी आपली भूक भागवण्यासाठी अल्प फी मध्ये दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध करून देणे या बरोबरच ग्रंथ संग्रह करणे, वाचन संस्कृती रुजवणे मराठी भाषेची जपवणूक करणे हे कार्य वाचनालयाच्या माध्यमातून केले जाते. याचा मारा व सर्वच विश्वस्त मंडळाला अभिमान वाटतो. ग्रंथालय चळवळ वाढवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील ग्राम ग्रंथालयांना मार्गदर्शन करून त्यांच्या प्रगतीसाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केले जातात. ज्या योगे खेड्या पाड्यातील वाचकांची वाचनाची भूक भागवली जावी थोडक्यात मागेल त्याला ग्रंथ व प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळवून देणे हे सर्व काम वाचनालयाच्या माध्यमातून आनंदाने व जिकरीने अथक पणे केले जाते. वाचनालयाचे वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यात व्याख्याने, परिसंवाद, ग्रंथ प्रदर्शने, स्पर्धा, चर्चासत्रे, सत्कार, शिबिरे यांचा समावेश होतो.
प्रमुख कार्यवाह श्री विक्रम राठोड म्हणाले :- टी. व्ही., व्हि.डि.ओ. गेम, इंटरनेट, कॉम्पुटर इ. सारख्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून वाचकांना ग्रंथालय सेवा अधिक सुलभ पणे देता यावी यासाठी वाचनालय प्रयत्नशील आहे. ई लायब्ररी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने वाचनालयाच्या एक लाखाच्यावर च्या वर पुस्तकांचा डाटा संगणकात फिट केला असून सर्व पुस्तकांना बार कोडींग केले आहे. प्रत्येक सभासदाचा मेंबर आय. डी. तयार केला असून प्रत्येक सभासदाला मेंबर कार्ड देण्यात आले आहे. या सर्व कामकाजा मुळे ग्रंथालय सेवा देणे सुलभ झाले आहे.
वाचनालयाची वेब साइट :- www.ajivalibrary.org या नावाने तयार केली असून वाचनालयाच्या ई-मेल आय. डी. [email protected] असा आहे. इंटरनेटद्वारे घरबसल्या आपण वाचनालयातील वाचन साहित्याची माहिती घेवू शकता. या प्रकारच्या संगणिकीकरणा मुळे वाचकांची सोय झाली आहे. भविष्यात हि अनेक योजना आहेत या सर्व योजना टप्प्या टप्प्याने वाचनालयात राबविण्यात येणार आहेत.